‘सीबीआय तोता है’च्या जोरदार घोषणा देत; तृणमुलच्या खासदारांचा लोकसभेत गोंधळ

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-पश्चिम बंगालमधील सीबीआय कारवाईचे पडसाद सोमवारी (दि.४) लोकसभेत उमटले. केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करावे लागले. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी 'सीबीआय तोता है' अशा जोरदार घोषणा दिल्या.


त्यावर उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी, ममता कुणाला पाठीशी घालत आहेत, असा आरोप केला आहे. कोलकाता येथील घटना देशातील संघराज्य प्रणालीसाठी धोक्याच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

तृणमूल खासदारांनी सीबीआयचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला लक्ष्य केले. यावेळी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी तृणमूलच्या खासदारांना प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा विषय मांडा, असे सांगितले. मात्र, खासदारांनी भाजप विरोधात घोषणा देणे सुरूच ठेवले. यावेळी तृणमूलच्या खासदारांना तेलंगणा राष्ट्र समितीने समर्थन दिले. यामुळे गदारोळ कायम राहिल्याने कामकाज काहीवेळ तहकूब केले.

शारदा चिटफंड घोटाळ्यात हात असल्याच्या संशयावरून कोलकाताच्या पोलिस आयुक्तांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकून चौकशी केली. त्यानंतर त्या अधिकार्‍यांनाच पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Review