पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

वेलिंगटन,(सह्याद्री बुलेटीन)-न्यूझीलंड विरुद्ध आजपासून सुरु झालेल्या टी२० सामन्यांच्या मालिकेत आज भारताचा पहिल्याच टी२० सामन्यामध्ये ८० धावांनी दारुण पराभव झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय भारतीय संघावर चांगलाच 'बुमरँग' झाला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाहुण्या संघाच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करताना २० षटकांमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडकडून सलामीवीर टी सेइफर्टने ४३ चेंडूंमध्ये ८४ धावांचा पाऊस पाडत भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. मुनरो आणि विलियम्सन यांनी प्रत्येकी ३४ धावांची खेळी करत सेइफर्टला चांगली साथ दिली.

२१९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात पडझडीनेच झाली. भारताचा सलामीवीर तथा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या एका धावेवर बाद झाला. धवन आणि शंकर यांच्या जोडीने भारतीय संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र ते देखील जास्त काळ मैदानावर तग धरू शकले नाहीत. अनुभवी महेंद्र सिंह धोनीने भारताला मेजवानी संघाच्या धावसंख्येचा आसपास घेऊनजाण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. शेवट भारताचा संपूर्ण संघ १३९ धावांवर तंबूत परतला.

Review