भोसरी रुग्णालयाच्या खाजगी संस्थेत देण्यास मनसेचा विरोध.
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-महापालिकेच्या वतीने भोसरी येथे उभारण्यात आलेले नवीन रुग्णालय खाजगी संस्थेत देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांचे नेतृत्वाखाली आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भोसरी येथे नव्याने उभारणी होत असलेले सुसज्य रुग्णालय लवकरच चालु करण्यात येत आहे. हे रुग्णालय महानगरपालिका न चालवता सत्ताधारी पक्षाने रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्याचा घाट घातला आहे. दि.०४/०२/२०१९ रोजी महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यामध्ये विषय क्र.५ रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्याचा विषय होता. परंतु सत्ताधारी पक्षाने कोणत्याही नगरसेवकांचे म्हणणे न ऐकता हा विषय मंजूर करून घेतला. या विषयामध्ये भरपूर तफावत आहे. त्यामुळे रुग्णालय खाजगी संस्थेस देण्यास आमचा विरोध राहील.
यावेळी रूपेश पटेकर, राजू सावळे, सुरेश सकट, के.के.कांबळे, रवी जाधव, मिनाताई गटकळ, सीमाताई बेलापुरकर, रूपाली गिलबिले,स्नेहल बांगर,अनिता पांचाळ,संगिता देशमुख, दक्षता क्षीरसागर, प्राजक्ता गुजर, पंकज दळवी, गणेश पाटिल, रोहित काळभोर, मयूर हजारे आदी उपस्थित होते.
• निवेदनातील महत्वाचे मुद्दे –
१) भोसरी रुग्णालय कोणत्या संस्थेस चालवण्यास देणार आहे, हे कोणालाही माहीती नाही.
२) हे रुग्णालय खाजगी संस्थेस ३० वर्ष चालवण्यासाठी देण्यात येणार आहे यास आमचा विरोध राहील.
३) या रुग्णालया मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. आमचे असे म्हणणे आहे की, शहरातील सर्व नागरिकांना उपचार व सोयी-सुविधा मोफत मिळावे व वायसीएमच्या धर्तीवर चालविण्यात यावेत.
४) हे रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास दिले तर त्यापासून महानगरपालिकेला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.
५) महापालिकेत मंजूर झालेला विषय क्र.५ हा रद्द करून पुन्हा एकदा चर्चेसाठी सभागृहात आणावा.