पुणे -पालिकेच्या जलतरण तलावांना लावले कुलूप

पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – शहराला पिण्यासाठी धरणातून दिल्या जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरातील पालिकेचे सर्व जलतरण बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून सर्व जलतरण तलाव बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

शहरात महापालिकेचे 31 जलतरण तलाव असून त्यातील 4 तलाव बंद आहेत. तर उर्वरित 27 तलाव सुरू आहेत. यातील बहुतांश तलावांसाठी बोअरवेलचे, तर काही तलावांसाठी पिण्याचे पाणी वापरले जाते. मात्र, बोअरवेलच्या पाण्याचा उपसा न करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने सर्व जलतरण तलावांना मागील आठवड्यात नोटीस बजाविली होती. त्यानंतर सोमवारी मालमत्ता विभागाच्या निरीक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, तलाव बंद करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच तलाव चालविण्यासाठी देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून “तलाव बंद’ असल्याचे फलकही लावण्यात आलेले आहेत.

ठेकेदारांचे आर्थिक नुकसान
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, हे तलाव बंद करण्यात आले असले, तरी ठेकेदरांकडून त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रामुख्याने महापालिकेच्या जलतरण तलाव चालविण्यासाठी घेतला मोठी रक्कम भरावी लागते. तर केवळ उन्हाळ्यातच तलावांना गर्दी असते, त्यातूनच हा खर्च निघतो. पावसाळा तसेच हिवाळ्यात तलावांत येणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. अशा स्थितीत उन्हाळा सुरू होतानाच तलाव बंद करण्यात आल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने ठेकेदारांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

Review