देशाच्या संविधानाला डावलण्याचा प्रयत्न ;केंद्रात भाजपची सत्ता नसून त्यावर संघाचे नियंत्रण – राहुल गांधी

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्याकडे आहे. केंद्रात भाजपची सत्ता नसून त्यावर संघाचे नियंत्रण आहे. प्रत्यक्षात संघाकडून हा देश चालवला जात आहे. त्यामुळेच देशाच्या संविधानाला डावलण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्यांक संमेलनामध्ये राहुल गांधी बोलत होते. राहुल म्हणाले, हा देश ज्या मूलभूत तत्वांवर उभा आहे. त्या प्रत्येक तत्वाला उखहून टाकण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. देशातल्या प्रत्येक सरकारी संस्थेत संघाचा एक तरी माणूस असला पाहिजे, हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मोदी सरकारकडून फक्त द्वेष पसरवला जातो आहे. द्वेषाचे राजकारण करून देश जिंकता येत नाही. त्यामुळे या सरकारचा पराभव झालाच पाहिजे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाच्या वरचढ समजतात. मात्र, देश यांच्यापेक्षा वरचढ आहे आणि येत्या तीन महिन्यात याचा प्रत्यय त्यांना येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भित्रे आहेत, मी भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो माझ्याशी फक्त दहा मिनिटे त्यांनी चर्चा करावी.

अमित शहांकडून कामात आडकाठी

देशाचा मूलभूत पायाच पोखरण्याचं काम या सरकारने केले असल्याचा दावा करताना यासंदर्भात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचेही उदाहरण दिले. चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करू दिल जात नाही, असाही आरोप केला होता याचे त्यांनी स्मरण करून दिले. लोकशाहीसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब ठरली होती. त्यावेळी त्यांनी न्या. लोया यांचेही नाव घेतले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कामात आडकाठी करत आहेत, असाच आरोप त्या न्यायाधीशांनी अमित शहा यांचे नाव न घेता केला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Review