प्रियांका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत लखनऊमध्ये भव्य रोड शो

लखनौ,(सह्याद्री बुलेटीन)-राजकीय मरणासन्न अवस्थेत गेलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये जान फुंकण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा सज्ज झाल्या आहेत. प्रियांकांच्या फुलटाईम राजकीय कारकिर्दीला आज प्रारंभ होत आहे. प्रियांका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत लखनऊमध्ये भव्य रोड शो करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका यांच्यावर पूर्वोत्तर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. आज प्रियांका आणि उत्तर प्रदेश प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांचे दिल्लीहून लखनऊमध्ये आगमन होईल.

प्रियांका राहुल गांधी यांच्या साथीत सकाळी १५ किमी भव्य रोड शो करणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास हा रोड शो काँग्रेस कार्यालयात पोहोचेल. विमानतळापासूनच प्रियांकांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे. प्रियांका यांच्यासह इंदिरा गांधी यांचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.

रोड शो नंतर कार्यालयात पोहोचल्यावर प्रियांका प्रदेश पातळीवरील नेत्यांशी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. आगामी तीन दिवसांचा त्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रियांका पहिल्यांदा सीतापूरमधील लोकांशी प्रथम संवाद साधणार आहेत. त्यानंतर घोसी, आजमगड, जौनपूर, आणि बलियामधील लोकांशी संवाद साधतील. प्रियांका यांच्यावर पुर्वोत्तर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या १८ फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला प्रारंभ करतील.

राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. पूर्वोत्तर उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी केलेली प्रियंका गांधी वधेरा यांची नियुक्‍ती हा काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. सरचिटणीसपदी नियुक्‍तीनंतर प्रियांका प्रथमच उत्तर प्रदेशात येत आहेत.

पूर्व उत्तर प्रदेशात काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ अमेठी आणि रायबरेलीसह पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी, योगी आदित्यनाथ यांचा दीर्घकाळचा गड असलेला गोरखपूर, लखनौ, आझमगढ, अलाहाबाद, देवरिया, बस्ती आणि चंदवली यांचा समावेश आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ७१ जागा मिळविल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला उत्तर प्रदेशात रोखण्याचे मोठे आव्हान राहुल आणि प्रियांका यांना पेलावे लागणार आहे.

सपा आणि बसपाने जागावाटपात काँग्रेसला विशेष महत्त्व न देण्याचे धोरण अवलंबविले. त्यामुळे काँग्रेस आता उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्यासाठी तयारी करीत आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी वधेरा आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपासह सपा आणि बसपा यांच्याशी थेट लढत द्यावी लागणार आहे. प्रियांका या निवडणूक लढविणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रियांका यांच्या राजकारणात सक्रिय होण्याने पक्षसंघटनेत उत्साह निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

Review