वाहतुकीचे कायदे कडक करण्याची गरज – व्यंकटराम कल्याणम्‌

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) – हल्ली वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. रस्त्यावर माणसांच्या पेक्षा वाहनांची संख्या अधिक दिसते. लहान मुलांकडेही दुचाकी, चारचाकी वाहने दिसतात. पण, कायदा, नियम कुणालाच माहित नाहीत. माहित असले, तरी त्याचे पालन कुणीच करताना दिसत नाही. त्यामुळे माणसांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करा आणि त्याची अंमलबजावणी देखील कडकपणे करा, असे आवाहन महात्मा गांधी यांचे खासगी सचिव, 96 वर्षीय व्यंकटराम कल्याणम्‌ यांनी केले.

निमित्त होते, मोटार कार रॅली स्वागत समारंभाचे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलिंगा मोटार स्पोर्टस्‌ क्‍लबतर्फे दिल्ली येथून 4 फेब्रुवारीपासून निघालेल्या या रॅलीचे स्वागत नाशिक फाटा, कासारवाडी येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थे (सीआयआरटी) मध्ये करण्यात आले. त्यावेळी कल्याणम्‌ बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले, सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी आनंद पळसुले, कल्याणम्‌ यांची कन्या मालिनी कल्याणम आदी उपस्थित होते.

कल्याणम्‌ म्हणाले, सिमला येथे माझा जन्म झाला, त्यावेळी वाहन तर सोडाच, साधी सायकल देखील पहायला मिळायची नाही. तेथील नागरिकांना दहा वर्षानंतर रिक्षा पाहायला मिळाली. हल्ली वाहनांची संख्या खुपच वाढते आहे. पण, रस्त्याचे नियम कुणी पाळत नसल्यामुळे अपघात होताहेत. लहान मुलांच्या कडेही आज वाहने आहेत. त्यांना नियमच माहित नसल्यामुळे अपघात होताहोत. आपण चालताना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालले पाहीजे, डाव्या बाजुने नाही. तरच, पादचाऱ्यांचे अपघात होणार नाहीत, असेही ते म्हणाले. अभय दामले म्हणाले, महात्मा गांधी सहनशिलता आणि अहिंसा खुप मानत. वाहन चालवितानाही ह्या गोष्टींचा विचार केला तर अपघात होणार नाहीत. आनंद पळसुले यांनी मनोगत व्यक्त केले.

महात्मा गांधीजींच्या निवासाला भेट
रॅलीतील कलिंगा क्‍लबचे लाजपत प्रसाद, इ. जी. उमामेहश, भामिनी शंकर यांनी रॅलीदरम्यानचे अनुभव कथन केले. सनेर पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद देव यांनी आभार मानले. रस्ता सुरक्षा हे ब्रिदवाक्‍य घेवून निघालेल्या या रॅलीमध्ये वय वर्ष 20 ते 96 पर्यंतचे 33 जण सहभागी झाले असून त्यात व्यंकटराम कल्याणम्‌ यांचा समावेश आहे. दहा महिलांही प्रवास करत आहेत. एकूण 7 हजार 250 किलोमीटरचा प्रवास करून म्यानमार येथील यॉंगआँग येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या दरम्यान महात्मा गांधी यांनी जिथे-जिथे निवास केला, त्याठिकाणाला भेटी दिल्या जाणार आहेत.

Review