साहित्यिकांनी जीवनप्रवाहात उडी घेऊन लेखन केले पाहिजे - पानिपतकार विश्वास पाटील

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- “साहित्यिकांनी टीप कागदासारखे जीवन टिपले पाहिजे त्यासाठी त्यांनी जीवनप्रवाहात उडी घेतली पाहिजे त्यात न्हाईले पाहिजे मग साहित्याची निर्मिती केली पाहिजे तर ते साहित्य सकस आणि काळाच्या प्रवाहबरोबर टिकणारे होईल.” असे प्रतिपादन पानिपतकार, ज्येष्ठ साहित्यिक , माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, “कुठलेही लोखंड तापलेले असतानाच त्याला आकार द्यायचा असतो. तारुण्यात्च विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. १९०६ साली वाघाबरोबर कुस्ती खेळणार्याक तराबाईपासून ते स्वत:च्या घरात विमान बांधणार्या१ कोल्हापूरच्या अमोल यादवांपर्यंत अनेक आदर्श तरुणाई पुढे उभे आहेत त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी केवळ शिखर गाठण्याचे ध्येय ठरविले पाहिजे” यापुढे इतिहास आणि मराठी भाषेविषयी बोलताना ते म्हणाले की, “मराठी भाषेसारखी दुसरी भाषा या जगात नाही. वाघिणीचे दूध आणि नागिणीच्या विशाचे औषधी रूप म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेबरोबरच स्वराज्याच्या इतिहासावर प्रेम केले पाहिजे. काशी रामेश्वर नाही पाहिला तरी चालेल, पण रायगड पाहिला पाहिजे.’ जीवनामध्ये जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून, ‘मरावे कसे’ हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पानिपतकर विश्वास पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “महाराष्ट्रात अनेक अनुकरणीय हस्ती होऊन गेल्या जो इतिहास वाचतो, तो इतिहास घडवितो. म्हणून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांची चरित्रे वाचली पाहिजेत त्याचे विचार अंगिकारले पाहिजेत.”
महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्याध्यक्षा प्रा. अलका चव्हाण यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. गुणवत्ता विकास व शैक्षणिक अहवालाचे वाचन डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अहवाल वाचन डॉ. भारती यादव यांनी केले तर क्रीडा अहवालाचे वाचन डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ म्हणून सन्मान करण्यात आला. यानंतर विशेष गुणवत्ता प्राप्त प्राध्यापकांचे सन्मान करण्यात आले. विशेष कलागुण संपन्न विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला .तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य मिळविणार्या खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या ‘मास कम्युनिकेशन’ विभागाच्या वतीने “रयतवार्ता” हे स्नेहसंमेलन विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे कला विभागाच्या उपप्राचार्या प्रा. मृणालिनी शेखर, विज्ञान उपप्राचार्या संजीवनी पाटील ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. एकनाथ कळमकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Review