नागपूर: दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा आणि पुतळा जाळून शिवसैनिकांनचे आंदोलन
नागपूर,(सह्याद्री बुलेटीन)-जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसैनिकांनी आपला राग राज्याच्या उपराजधानीत व्यक्त केला. शिवसैनिकांनी वाठोडा परिसरात पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच पाकिस्तानचा पुतळा जाळून आपला तीव्र रोष व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात शहरप्रमुख राजू तुमसरे, मंगेश कडव, चिंटू महाराज, मुन्न्ना तिवारी, राजू कनोजिया यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड कृत्याचा समाजातील सर्वच स्तरातून कडाडून निषेध केला जात आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, यासाठी प्रत्येक हिंदुस्थानी आग्रही आहे. राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केला. आज नागपुरात शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी वाठोडा परिसरात पुलवामा येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला.
शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. चर्चेच्या मार्गाने पाकिस्तान सारखा देश सुधारणार नसून त्याला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले.