पिंपरी: शाहिद जवानांस श्रध्दांजली अर्पण; महापालिकेची सर्वसाधारण सभा केली तहकूब

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सर्वपक्षीय नगरसेवकांच्यावतीने श्रध्दांजली वाहून सभा दि.२२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीलाच भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याची सूचना मांडली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सर्व पक्षाच्यावतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सभा तहकूब करण्याच्या सूचनेस अनुमोदन दिले. त्यानंतर शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सभा तहकूब केली. यासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड होणार असल्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

 

Review