पुलवामा:जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उदयनराजे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
सातारा,(सह्याद्री बुलेटीन)- पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वाढदिवस येतील आणि जातील, पण आज जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
24 फेब्रुवारीला उदयनराजे यांचा वाढदिवस आहे. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांना फक्त सातारा नव्हे तर राज्यभरात कुठेही शुभेच्छांचे फलक लावू नये तसंच हार पुष्पगुच्छ भेट म्हणून देऊ नये असं आवाहन केलं आहे.

उदयनराजे यांनी पत्रात लिहिलं आहे की, ‘जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी आमच्या वाढदिवसांचे शुभेच्छा फलक सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कोठेही लावू नयेत. तसंच आम्हाला वाढदिवसानिमित्त हार-पुष्पगुच्छ इत्यादी भेट देऊ नये’.