
Surgical Strike2:भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार?
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे साडे तीनच्या ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळजवळ 300 दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत भारताच्या सुरक्षा दलांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
तर पाकिस्तानी सैन्याने भारतीय विमानांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. मात्र, यात पाकिस्तानच्या हद्दीत कोणतेही नुकसान झालेले नाही. पाकने भारताच्या विमानांना चोख प्रत्युत्तर दिले, असे पाकने म्हटले आहे.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी भारताच्या हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.