घालीन लोटांगण वंदीन चरण ! चर्चेला आमंत्रण भारत तुला !! नको रे युद्ध होऊन शुद्ध नको रे क्रुद्ध होऊ आता !! भारत पुढे पाकिस्तानची सपशेल शरणागती...

इस्लामाबाद (सहयाद्री बुलेटिन ) - भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे आमंत्रण दिले असून युद्ध करू नये अशी आळवणी केली आहे.

खान म्हणाले, ''भारताने काल केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही.''
'' जे युद्ध सुरू करतात त्यांनाही या युद्धाचा शेवट काय असेल हे ठावूक नसते. आज युद्धाला तोंड फुटल्यास त्यावर माझे वा मोदींचे नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही दहशतवादावर चर्चेला तयार असाल तर आम्हीही चर्चेला तयार आहोत.'' असेही इम्रान खान यांनी सांगितले.
लवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भारतासमोर लोटांगण घालणारी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली आहे. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात असं सांगत खान यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला.

पाकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. पुलवामामध्ये भारतीय लष्कराचे ४१ जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यानंतर भारतानं तेराव्या दिवशी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत जैश ए मोहम्मदच्या ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती ओढवली असून भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.

पुलवामा प्रकरणाची चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत इम्रान खान यांनी एकप्रकारे भारतासमोर नांगी टाकल्याचे दिसत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्ताननं थारा देऊ नये असं सांगत अमेरिका व चीननंही भारताच्या बाजुनं मत व्यक्त केल्यामुळे पाकिस्तानला उपरती झाल्याचे दिसत आहे.

आता या परिस्थितीत भारत काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

 

Review