त्यागी आणि चांगल्या सहकाऱ्यांच्या साथीने दिव्यांगांचे अश्रू पुसणार - शिवशाहीर विजय तनपुरे
सिन्नर (सह्याद्री बुलेटिन ) : मला सतशील, त्यागी आणि चांगल्या लोकांचे सहकार्य लाभले यांच्या साथीनेच गोरगरीब,अंध,अपंग, या दिव्यांगांचे अश्रू पुसणार, असे भावनिक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे शिवाश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी तनपुरे व गीते परिवारातील सदस्यांसह अशोक महाराज घुमरे, महामंडलेश्वर जयानंद सरस्वती, उद्योजक शिवनाथ कापडी, किरण बडगुजर, कांतिभाई पटेल, त्रिलोकनाथ अग्रवाल, सहारा संस्थेचे सेक्रेटरी रेलीनो डिक्रूज, शामराव खुळे, माजी उपसरपंच सिताराम गीते, उपसरपंच जयश्री गीते, प्रा. रत्नाकर गडाख, सचिन ओझा, ऍड. भाग्यश्री ओझा, माजी सैनिक भागवत रणदिवे, प्रकाश खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबाने सव्वा एकर जागा दान केली आहे. आमटे परिवाराचा आदर्श घेऊन मधुकर गीते यांनी व्यसनमुक्तीचे मोठे काम सिन्नरमध्ये उभे केले आहे. त्यांचे या प्रकल्पासाठी असणारे योगदान अमूल्य असून सहाराचेकार्य शिवाश्रम देखील पुढे घेऊन जाईल असे डॉ. तनपुरे यांनी नमूद केले. बारा लाख रुपये मूल्याची जागा कोणत्याही अटीशर्तीं विना गीते कुटुंबीयांनी शिवाश्रमाच्या नावे केली. समाजातील दिव्यांग घटकांच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेला त्याग खूप मोठा असल्याचे सांगतांना डॉ. तनपुरे व त्यांच्या पत्नी मनीषा यांना भूमिपूजन करताना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी बोलताना जलाल महाराजांनी अध्यात्म सेवेतील आपल्या कमाईचा अडीच टक्के हिस्सा प्रकल्पासाठी देण्याचे कबूल केले. किरण बडगुजर यांनी सहारा व्यसनमुक्ती केंद्राप्रमाणेच शिवाश्रमासाठी देखील सर्वांगीण मदत करण्याची ग्वाही दिली. शिवनाथ कापडी यांनी आश्रमाच्या नियोजित जागेसाठी संरक्षक भिंत बांधून देण्याचे जाहीर केले. अन्य उपस्थितांनी देखील आश्रमासाठी यथाशक्ती मदत करणार असल्याचे सांगितले. शिवाश्रमाला FCRA चे सर्टीफीकेट सुध्दा मिळाले आहे ज्याच्या आधारे परदेशातील देणग्याही स्विकारता येणार आहे.
लवकरच या शिवाश्रमाची उभारणी होऊन वर्षाअखेर राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होईल असा विश्वास यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केला.