
Air strike: 300-350 दहशतवादी मारले गेले, संख्या आली कुठून?पी.चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका.
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन) -भारताने पाकिस्तनावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर विरोधकांनी या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत पुरावे मागायला सुरवात केली आहे. आज (ता. 4) काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. आमची शंका एअर स्ट्राईक नाही, पण या हल्ल्यात 300-350 दहशतवादी मारले गेले, असे कोणी सांगितले, असा सवाल चिंदबरम यांनी ट्विटद्वारे केला आहे.
'जगाने एअर स्ट्राईकवर विश्वास ठेवायचा असेल, तर सरकारने विरोधकांवर आरोप करणे टाळले पाहिजे.' तसेच भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक विषयी अधिक माहिती द्यायला नकार दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या स्ट्राईकमध्ये कोणीही नागरिक किंवा सैनिक मारला गेला नाही, तर 300-350 ही दहशतवाद्यांची संख्या आली कुठून? असा सवाल चिदंबरम यांनी केला.
बालाकोटमधीस हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाचे कौतुक करणारे राहुल गांधी पहिले राजकारणी होते. मोदी हे कसे विसरले? असा सवाल चिदंबरम यांनी विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाटण्यातील संकल्प रॅलीमध्ये विरोधक एअर स्ट्राइकचा पुरावा मागत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली होती. या अशा गोष्टीमुळे सैन्याचे मनोबल कमी होते असे मोदी म्हणाले. त्यानंतर चिदंबरम यांनी हे टि्वट केले आहे.