पुणे – संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पाहता येणार लढाऊ विमान
पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – गेल्या आठवडाभरापासून सर्वत्र एअर स्ट्राइक, हवाई दलाची कामगिरीची चर्चा सुरू आहे. यात वापरले गेलेली “मिराज 2000′ ही लढाऊ विमानेदेखील केंद्रबिंदू आहेत. त्यातूनच लढाऊ विमानांबाबतचे कुतूहल वाढले आहे. अशाच प्रकारचे वायुसेनेचे एक लढाऊ विमान पाहण्याची संधी पुणेकरांसाठी खुली झाली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय वायुदलाचा इतिहास, त्याचा पराक्रम सदैव लक्षात रहावा, त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात वायुदलाचे जुने “एचपीटी-32′ हे विमान बसविण्यात आले आहे. याचे अनावरण रविवारी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ अवटी, निवृत्त विंग कमांडर आणि संस्थेचे अध्यक्ष विनायक डावरे, संस्थेचे प्रमुख विश्वस्त अशोक जांभोरकर, संस्थेच्या संस्थापिका-संचालिका तारा जांभोरकर आदी उपस्थित होते.
“एचपीटी-32′ हे विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत होते. गेल्या 30 वर्षांपासून ते वायुदलाच्या सेवेत होते. संस्थेच्या प्रांगणात हे विमान एका लोखंडी खांबावर उभे करण्यात आले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी गोखले म्हणाले, “सैन्याची कामगिरी ही अत्यंत महत्वाची कामगिरी असते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेताना मला माझ्या गुरुंनी एक मंत्र दिला होता की जे वर जातं, ते खाली येतं. त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवर राहायला हवेत. आज अभिनंदन हे एक महत्त्वाचे नाव आहे. प्रत्येकाला सैन्यात जाता आले नाही, तरी प्रत्येकाने देशासाठी प्रामाणिकपणे आपले काम करायला हवे.’