ट्रम्प यांचा भारताला आर्थिक झटका! 'मेड इन इंडिया' अडचणीत?
(सह्याद्री बुलेटीन)-अमेरिकेबरोबरच्या व्यापारात भारताला मिळणारे विशेष प्राधान्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समाप्त करायचे आहे. ट्रम्प यांनी तसा इरादा जाहीर केला आहे. अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमातर्गत भारताला मिळालेला लाभार्थीचा दर्जा समाप्त करण्याच्या दिशेने ट्रम्प यांनी पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमातर्गत भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ५.६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर कुठलाही कर लावला जात नाही.
भारतात अमेरिकी उत्पादनांवर मोठया प्रमाणात कर आकारला जात असल्याचा मुद्दा त्यांनी अनेकदा उपस्थित केला आहे. भारत सरकारबरोबर बरीच चर्चा झाली. पण अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समन्यायी वागणूक देण्याबाबत भारताकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे आपण हे पाऊल उचलत आहोत असे ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.