जळकोट मध्ये जनावरांची पाणी-चाऱ्यासाठी भटकंती;चाराछावण्या उभारण्याची मागणी
सिध्दार्थ सूर्यवंशी
जळकोट,(सह्याद्री बुलेटीन)-या तालुक्यात या वर्षी अतिशय कमी पाउस झाल्यामुळे व शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरण्या ऐवजी सोयाबीन,मूग,उडीद हे पिके घेतल्याने कडब्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे जनावरांची चारा-पाण्यासाठी तीन तीन किलोमीटर भटकंती करावी लागते आहे.
या तालुक्यात पशुधनाची संख्या 50 ते 55 हजाराच्या वर आहे. बंजारा समाजाच्या वाड्यांची संख्या 20 ते 25 असून त्यांचा पारंपरिक व्यवसाय गुरे-ढोर राखणे हा आहे. प्रत्येक कुटुंबाकडे चार चार खडी जनावरे असून ते शेतक्याकडून अरदलीच्या बोलीने गुरे-ढोरे राखतात.तालुक्यातील माळहिप्परगा, चाटेवाडी ,जंगमवाडी साठवण तलाव सोडले तर बाकीचे नऊ साठवण तलावातील पाणी जोत्याखाली गेले आहे.
यामुळे या तलाव परिसरात जनावरे चारा पाण्याचा शोध घेत आहेत.माळराणावरती निव्वळ दगड गोट्यात तोड घालून जगण्याचा पर्याय शोधत आहेत .चाऱ्या एवजी जनावराचे कुपोषण होऊन ते अशक्त व भाकड होत आहेत दुष्काळा ची तीव्रता दिवसागणिक वाढत असल्याने,तात्काळ जनावरांसाठी शिवाजी नगर तांडा , माळहिप्परगा,रावणकोळा , आतनूर , गुत्ति, कोळनूर, वाजरवाडा ,जगळपुर, शिंदगी या ठिकाणी चारा छावण्या उभ्या करून पशुधनाची जोपासना करावी अशी मागणी जी.प गट नेते संतोष तिडके, जी प सदस्य रुक्मिणीबाई जाधव, जी प सदस्य आणिता परगे प.स सभापती व्यंकट केंद्रे ,बाजार समितीचे सभापती मन्मथ अप्पा किडे, मारोती पांडे, सरपंच बालाजी आगलावे, मेहताब बेग, चंदन पाटील, दाउद बिरादार, गोविंद केंद्रे, साहेबराव पाटील येवरे, दिलीप कोकणे, शिरीष चव्हाण, सत्यवान पांडे, सिध्दार्थ सूर्यवंशी,आदींनी केली आहे.