पुणे -‘आरटीई’ राखीव मोफत प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून सुरू

पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीमध्ये दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25 टक्‍के मोफत प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास दि. 5 मार्चपासून सुरूवात होत आहे. येत्या 22 मार्चपर्यंत यासाठी अर्ज भरता येणार आहेत.

राज्यभरात 8 हजार 980 शाळांमध्ये “आरटीई’ प्रवेशाच्या 1 लाख 26 हजार 128 जागा मागील वर्षी उपलब्ध होत्या. या जागांमध्ये यंदा वाढ होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील 930 शाळा “आरटीई’ प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या. ऑनलाइन अर्जाची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दरम्यान, मागील वर्षी “आरटीई’ प्रवेशाची प्रक्रिया जानेवारीतच सुरू करण्यात आली होती, मात्र यंदा त्यास 2 महिने उशीर झाला आहे. त्यामुळे “आरटीई’अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची तीव्र नाराजी होती. लॉटरी पद्धतीने “आरटीई’च्या फेऱ्या पूर्ण होण्यास दोन ते महिने कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. “आरटीई’अंतर्गत प्रवेश न मिळल्यास पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे किमान आता तरी “आरटीई’ प्रवेशाची प्रक्रिया लवकर मार्गी लागण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Review