पिंपरी:अजितदादांनी घेतली आझम पानसरेंची भेट,नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवारी) सकाळी अचानक भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आझम पानसरेंच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत असले तरी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याने पानसरेंच्या घर वापसीच्या चर्चेने जोर धरला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आझम पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशावेळी भाजपने त्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, साडेचार वर्षात भाजपकडून कोणतीही आश्वासन पुर्ती न झाल्याने ते भाजपवर नाराज आहेत. आझम पानसरेंचा वापर विधानसभा निवडणुकीसह महापालिकेत सत्ता आणण्यासाठी करुन घेतला परंतु, त्यानंतर त्यांना कॉर्नर करण्यात आल्याची सल त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
दरम्यान, आज सकाळी दहाच्या सुमारास अजित पवार यांनी प्राधिकरण येथील निवासस्थानी आझम पानसरे यांची भेट घेतली. यावेळी विलास लांडे यांच्यासह ज्येष्ठ नेते नाना काटे, राजू मिसाळ उपस्थित होते. अर्धातासाहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाली. आझम पानसरे सध्या आजारी आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात आले असले तरी या भेटीदरम्यान राजकीय खलबतेही झाल्याचे समजते. पानसरे-पवार यांच्या भेटीमुळे शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.