पिंपरी: पहिल्याच दिवशी 'आरटीई' हॅंग

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात मंगळवारपासून झाली. मात्र, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये प्रवेशासाटी 25 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ऑनलाइन शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यानुसार मंगळवारी प्रवेशासाठी अर्ज करण्याचा पहिला दिवस होता.
प्रवेश प्रक्रियेचे अर्ज करण्यासाठी पालकांनी सकाळपासूनच मदत केंद्रावर रांगा लावल्या होत्या. मात्र, संकेतस्थळ सुरुच होत नसल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या प्रसंगी मदत केंद्र चालक व पालकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडले. यामुळे, दरवर्षी गोंधळलेल्या अवस्थेत असणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी अडथळे निर्माण झाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.

जीएसके इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक गणेश घोगरे यांनी सांगितले की, मदत केंद्रावर पालकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच गर्दी केली होती. संकेतस्थळ सुरु होत नसल्यामुळे अर्ज भरले जात नव्हते. महापालिकेत शिक्षण विभागात विचारणा केली असता संकेतस्थळ दुपारी तीन वाजता सुरु होणार असल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत पालकांनी केंद्रावर खूप गोंधळ घातला.

Review