मोदींनीच पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे राजकारण केले : राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

कांगरा,(सह्याद्री बुलेटीन) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. हिमाचल प्रदेशातील कांगरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे आरोप लावले असून, ते म्हणाले, “पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यानंतर मी पत्रकार परिषद आयोजित करून काँग्रेस परिवार भारतीय सैन्य आणि सरकार सोबत उभा असल्याचे सांगितले. आम्ही पुलवामा हल्ल्याचे राजकारण देखील करणार नाही हे देखील स्पष्ट केले परंतु जेव्हा विरोधी पक्ष अशा संकटसमयी सरकार सोबत खंबीरपणे उभा राहिला तेव्हा खुद्द मोदींनीच पुलवामावरून राजकारण करण्यास सुरुवात केली.”

यावेळी बोलताना त्यांनी सीआरपीएफ आणि बीएसएफ जवानांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर देखील शहीद दर्जा मिळत नसल्यावरून नाराजी व्यक्त करताना आपले सरकार सत्तेत आल्यानंतर आपण सीआरपीएफ आणि बीएसएफ जवानांना देखील शहीद दर्जा देऊ असे आश्वासन दिले.

Review