पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई नाही;कारवाईचे सर्व दावे खोटे- रवीश कुमार
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- 'पाकिस्तानचे सरकार जैश-ए-मोहम्मदच्या प्रवक्त्याप्रमाणे वागत आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून त्यांचे सर्व दावे खोटे आहेत', परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. ते शनिवारी (९ मार्च) परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रवीश कुमार नीरव मोदीबद्दल देखील बोलले आहेत. 'नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची पूर्वकल्पना आम्हाला होती. मात्र, कायदेशीर मार्गानेच त्याला भारतात आणले जाईल', असे रवीश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान अजूनही पुलवामा हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने घेतल्याची बाब नाकारत आहे. पाकिस्तान जैशच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करीत आहे का ?, असा सवालही यावेळी रवीश कुमार यांनी विचारला आहे. 'जर पाकिस्तानकडून नव्या विचारांच्या नव्या पाकिस्तानचा दावा केला जात असेल तर त्यांनी नव्या पद्धतीने कृती करून दहशतवादी संघटना आणि सीमेरेषेवरील दहशतवादाविरुद्ध कारवाई केली पाहिजे', असेही यावेळी रवीश कुमार यांनी म्हटले आहे.