पिंपरी-चिंचवड शहरवासियांना दिलासा; १ हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामाचा ‘शास्तीकर माफ’
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवडकारांना दिलासा मिळाला आहे. शहरातील १ हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या आदेशाची प्रत राज्य सरकारचे सह सचिव सं.श. गोखले यांनी शुक्रवारी (दि.8) महापालिका आयुक्तांना पाठविली आहे. या निर्णयाची माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, प्रदेश सदस्या उमा खापरे, अमित गोरखे, प्रमोद निसळ, अमोल थोरात आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना 2008 पासून शास्तीकर लागू झाला. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन 2012 पासून सुरु केली. सुमारे 70 हजारहून अधिक मालमत्तांना शास्तीकर लागू आहे. राज्य सरकारने यापुर्वी 500 चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ केला होता. आता 1000 हजार चौरस फुटपर्यंतच्या निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आला आहे. 601 ते 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या 18 हजार 150 मिळकती आहे. त्यांना याचा लाभ होणार आहे.
1000 हजार ते 2000 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींना मालमत्ता कराच्या 50 टक्के दराने शास्तीकर आकरण्यात येणार आहे. तर, 2000 हजार पुढील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्तीकर आकारण्यात येणार आहे.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. यामुळे गरीब आणि निमगरीब लोकांना त्याचा फायदा होणार आहे.