प्रशासनाने काळेवाडीतील पाण्याची समस्या न सोडविल्यास नगरसेविका नीता पाडाळे यांचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी - (सहयाद्री बुलेटिन ) - मागील दोन वर्षांपासून काळेवाडी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नसून याचा गांभीर्याने विचार करून समस्या सोडवा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा नगरसेविका नीता पाडाळे यांनी आयुक्त आणि जल विभागाला दिला आहे.

या बाबत बोलताना पाडाळे म्हणाल्या की, ज्योतिबा नगर, अश्विनी कॉलनी, साईराज कॉलनी, श्रद्धा कॉलनी, एकता / समता या कॉलनीमध्ये सतत कमी दाबाने पाणी येते. वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही पाण्याचा प्रॉब्लेम जसा आहे तसाच आहे.
गजराज कॉलनीमध्ये तर कित्येक वेळा अधिकारी येऊनही काही उपयोग झाला नाही शेवटी अमृत योजना अंतर्गत पाण्याच्या लाइन टाकायला सुरुवात झाली. यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम मिटेल असे वाटले पण त्यांनी फक्त पाण्याच्या लाईन टाकल्या, त्याची टेस्टिंग करून लोकांना कनेक्शन द्यायला हवे होते तसे मात्र केले नाही.
पंचनाथ कॉलनी, शिवरत्न कॉलनी मध्ये त्यांनी लाईन टाकल्या आणि कनेक्शन दिले, सुरुवातीला काही दिवस पहिल्या मजल्यावर पाणी गेलं त्यानंतर मात्र पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.
पाण्याला बिलकुल दबाव नाही, नागरिकांचे केवळ मीटर फिरतात पण पाणी मात्र अत्यंत कमी दबावाने येते, या समस्या घेऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तेवढ्यापुरते दोन दिवस नियमित पाणी येते त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती राहते. 80 टक्के लोकांना पाणीच मिळत नाही.
जल संबंधित अधिकाऱ्यांबद्दल बोलताना पाडाळे यांनी "अधिकारी केवळ शब्दांनी समाधान करतात कृती काहीच करत नाहीत. यामुळे जर प्रशासनाने पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत तर आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Review