लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज आज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. लालू प्रसाद यादव यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जामिनाची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने एन निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांना कोर्टाच्या या निर्णयाचा झटका बसला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजदला यंदा प्रथमच लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय निवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच लालू प्रसार यादव यांच्या दोन मुलांमध्येही एकमत नसल्याचे समोर आले आहे. त्यातच त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप याने राजद विरोधातच मोर्चा खोलला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या एनडीएमध्ये आहेत. त्यामुळे सध्या भाजप आणि जदयूला घेरणारा चेहरा राजदकडे नाही. लालूंचा दुसरा मुलगा तेजस्वी यादव यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र बिहारच्या जनतेला लालू प्रसाद यादव यांची प्रचारात कमी जाणवत आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या जामीन अर्जावर सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, गेल्या अनेक महिण्यांपासून लालू यादव प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून रूग्णालयात उपचार घेत आहेत. मग आताच कसे ते चांगले झालेत, तसेच ते निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मागत आहेत असे म्हटले आहे.
तसेच सीबीआयच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात जर लालू प्रसाद यांना जामीन मिळाला तर, उच्च पदांवरील भ्रष्टाचार प्रकरणी चुकीची परंपरा पडेल. तसेच सीबीआयने असेही म्हटलय की, गेल्या आठ महिण्यांपासून लालू प्रसाद यादव हे रूग्णालयात आहेत. मात्र तरीही ते इथूनच राजकारणाची सूत्रे हलवत आहेत. लालू प्रसाद यादव हे आपण खूप आजारी असल्याने कारागृहात राहू शकत नाही असे म्हणतात, यासाठी त्यांना रूग्णालयात खास वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. असे असताना ते आरोग्याच्या दृष्टीने तंदरूस्त कसे काय झाले. त्यांना आताच का जामीन कसा काय हवा आहे. यावरून ते निवडणूक प्रचारासाठीच जामीन मागत असल्याचे म्हटले आहे.