शिरूर लोकसभेतील मतदारांनो १०० टक्के मतदानाचा अधिकार बजावा
(प्रदीप मस्के)
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने...
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-लोकशाहीमध्ये लोकसेवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जुडलेली असली पाहिजे, जे लोक अशी निस्वार्थी लोकसेवा करतात ते लोकांमधून लोकनेते म्हणून पुढे येतात.(महाराष्ट्रातील काही सस्वयंघोषित लोकनेते सोडून) परंतु हल्ली काही उमेदवार जनतेच्या हिताचे प्रश्न लोकसभेत योग्य पद्धतीने मांडण्यासाठी आपणचं लायक आहोत असे समजून डॉक्टरी आणि अभिनयातील आपल्या व्यावसायिकतेसह लोकसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत... तर काही पूर्वी व्यावसायिक व व्यवसायिकतेच्या बळावर खासदारही झाले, आणि आता पुन्हा खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत.मुळात यांनी जनतेच्या हिताचे किती प्रश्न मार्गी लावले हा जनतेसाठी सर्वेक्षणाचा विषय आहे.
याच बरोबर खासदारकीच्या माध्यमातून जनतेचं हित झालं का ,व्यक्तिगत व्यावसायिक हित झालं? हा येथील मतदारांसाठी अभ्यासाचा विषय आहे. लोकशाही मध्ये आपला लोकप्रतिनिधी निवडताना सर्वसामान्य जनतेने काही निकष लावण आवश्यक असते. लोकशाहीत निवडणुका का? व कशासाठी? असतात याच्यावर सर्वसामान्यांनमध्ये प्रबोधन आवश्यक आहे.पण निवडणूक आयोग मात्र मतदार नोंदणी आणि मतदारयाद्या व निवडणुका घेणे या पलीकडे काही करताना दिसतं नाही.
असो जनतेची निःस्वार्थी सेवा करण्यासाठी सत्ता हवीच असं काही समीकरण नाही, विशेषतः अशा लोकांसाठी जे वेल सेटल व्यावसायिक, डॉक्टर आणि अभिनेते व इतर काही आहेत, आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथूनही आपल्याला जनतेचं चांगलं हित साधता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश आमटे आणि अभिनय क्षेत्रात काम करणारा नट अमीर खान..अशी अजूनही काही व्यक्तिमत्व सांगता येतील ज्यांचे लोकसेवेचे निकष वेगळे आहेत.... आणि यांचे मात्र वेगळे आहेत... आता सगळ्यांचे निकष तपासणे ही मात्र लोकशाहीतील राजा म्हणजे सर्व सामान्य जनतेची जबाबदारी आहे.
शेवटी निवृत्ती महाराज म्हणतात काही राजकीय मंडळींनी एवढी मजबूत बांधणी केली आहे की संस्था त्यांच्याच,शाळा त्यांच्याच, पतसंस्था ही त्यांच्याच आणि सहकारी संस्था आणि साखर कारखानेही त्यांचेच, बँकाही त्यांच्याच, कॉलेज ही त्यांचेच आणि त्यांच्याच या जागांवर काम करणार कर्मचारी त्यांचाच नातेवाईक सगा सोयरा, निवडणुकांनमध्ये मतदानाला येणारा वर्ग हा जेमतेम 60% ते 62% त्यातला 30% ते 31% त्यांचाच उरलेला 40% या प्रक्रियेत सहभागी ही होत नाही तो का होत नाही?हा ही सर्वेक्षणाचा विषय आहे.पण लोकशाहीत एक गोष्ट पक्की जो पर्यंत मतदानाची ही टक्केवारी 90% च्या पुढे जाणार नाही तो पर्यंत राजकारणातला हा नालायकपणा बंद होणार नाही आणि महाराष्ट्रात खरे अस्सल लोकनेते निर्माण होणार नाहीत त्यामुळे सर्व मतदारांना या लेखनाच्या निमित्ताने जाहीर अवाहन,लोकशाहीत आपण आपला मतदानाचा हक्क हा बजावलाचं पाहिजे.