इस्रोचा शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय
इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्राशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाईल. शुक्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पुढील १० वर्षात सात अंतराळ मोहीमा काढण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यातली एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. २०२३ मध्ये ही मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे.
शुक्र ग्रहावर कसं वातावरण आहे? शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत? विविध थर, वातावरण, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत या मोहीमेत अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेबाबतचे वृत्त समजताच जगभरातल्या सुमारे २० देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
येत्या १० वर्षांमध्ये इतरही अनेक मोहिमा आखून त्या यशस्वी करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. चांद्रयान-१ च्या प्रक्षेपणानंतर चांद्रयान २ चे प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. २०२२ मध्ये मंगळयान २ ही पाठवण्यात येणार आहे. मात्र शुक्र ग्रहावरच्या मोहिमेबाबत शास्त्रज्ञ जास्त उत्सुक आहेत. या मोहिमेची घोषणा केल्यानंतर आम्हाला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे असे इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी म्हटलं आहे.