लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना आग्रही, खासदार भावना गवळी दिल्लीला जाण्याची शक्यता...
एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, अशा भावना संजय राऊतांनी व्यक्त केल्या, हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे, लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याचा अंदाज बांधला जात होता. पण शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे गवळी यांना उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता बळावली आहे.