महावितरण कंपनीने उद्योजकांना होणारी नुकसान भरपाई द्यावी - युवक कॉंग्रेस ची मागणी.

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे उद्योजकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे यामुळे उद्योजकांना होणारी नुकसान भरपाई महावितरणने द्यावी - अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने भोसरी विभागाचे अधीक्षक अभियंता पंकज तगणपल्लेवार यांच्याकडे करण्यात आली असून भोसरी एम.आए.डी.सी. तील वीज पुरवठा समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी चिंचवड सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे पदाधिकारी विशाल कसबे, कुंदन कसबे आदी पदाधिकारी उपस्थित होते

या निवेदनात भोसरी एम.आए.डी. सी. परिसरातील वीज पुरवठा गेली २२ तास खंडित झाला होता त्यामुळे अनेक उद्योजकांना करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे, सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड हि उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते शहरात भोसरी व चिंचवड हि सर्वांत जुनी व मोठी एम.आए. डी. सी. आहे यामध्ये अनेक छोटे मोटे कारखाने आहेत यामध्ये पिंपरी चिंचवड शहर तसेच राज्यभरातून अनेक कामगारांना रोजगार निर्माण होतो. गेली काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे व भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नवीन कारखाने राज्यात तसेच पिंपरी चिंचवड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार नाहीत.

अशा परिस्थितीमध्ये महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे 22-22 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने वेळेत उत्पादन न देता आल्याने तसेच कामगारांना बसून पगार द्यावा लागत असल्याने मोठे नुकसान होत आहे. व त्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती मध्ये उद्योजक आपला कारखाना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीत आहेत. याआधी अनेक कारखाने हे शहराबाहेर गेले आहेत. परिणामी पिंपरी चिंचवड मधील बेरोजगारी वाढत आहे.

या कारणास्तव युवक काँग्रेसच्या वतीने कायमचा तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले तसे न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

Review