महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात भोंगळ कारभार - नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर

पिंपरी ( सह्यद्री बुलेटिन ) - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होतआहे. तसेच ६० कंत्राटी परिचारिकांची मुदत संपल्याने कर्मचाºयांची कमतरता भासत आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय विभागाचा हा भोंगळ कारभार आहे, असा आरोप नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात आल्यानंतर चांगले उपचार मिळतील अशी रुग्णांमध्ये आशा असते; मात्र औषधांचा नेहमीचाच तुटवडा व डॉक्टर्स आणि नर्सेस ची कमतरता यांमुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत. रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाºयांचा अनेक महिन्यांपासून तुटवडा आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, वायसीएम रुग्णालयात रुग्णांची वर्दळ वाढली आहे़ त्यातच रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी धर यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. सुलक्षणा शीलवंत-धर म्हणाल्या, ‘‘टायफॉईड, डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच शहरातील सर्वांत मोठी वैद्यकीय सेवा पुरवणाºया वायसीएमकडे सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना हजारो रुपयांची औषधे, खासगी औषध विक्रेत्यांकडून विकत घ्यावी लागतात. रुग्णालयांत औषधे का उपलब्ध होत नाहीत यामागे नक्की काय गौडबंगाल आहे याची चौकशीही झाली पाहिजे.’’

Review