पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सहा पूल वाहतुकीसाठी बंद

पुणे जिल्ह्य़ातील मावळ, मुळशी तालुक्यांमधील धरणांच्या परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना नद्यांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या सर्व पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केल्यानंतरच हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत.शहरासह जिल्ह्य़ातील पूर परिस्थिती, वाहतूक, नागरिकांचे स्थलांतर याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वाहतूक शाखेचे उपआयुक्त पंकज देशमुख या वेळी उपस्थित होते. शहरासह जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणारी १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. या सर्व धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये राजीव गांधी पूल (औंधगाव ते डांगे चौक मार्ग), जुना सांगवी पूल (स्पायसर महाविद्यालय ते जुनी सांगवी/ नवी सांगवी मार्ग), दापोडी पूल (भाऊ पाटील रस्ता ते दापोडीगाव मार्ग), जुना होळकर पूल (खडकीबाजार ते साप्रस मार्ग), पुणे शहरातील बाबा भिडे पूल आणि महापालिका भवन जवळील जयंतराव टिळक पूल असे सहा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. धरणक्षेत्रांत पडणारा पाऊस आणि धरणांमधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग यावर हे पूल वाहतुकीसाठी कधी खुले करणार हे अवलंबून आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर, बंद ठेवण्यात आलेल्या या पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतुकीची माहिती punetrafwatch.com या वेबपेजवर जाऊन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी या वेळी केले.

Review