पुरग्रस्तांना वाचवणारी बोट उलटून ९ जणांचा मृत्यू ,कोल्हापूर, सांगली, सातारा भीषण स्तिथीत...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत पावसामुळे १६ जणांचा बळी गेला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. सांगलीमध्ये पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात पुरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट पलटून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर १६ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून इतरांचा शोध सुरु आहे. यावेळी जवळपास १९ जण पोहत काठावर पोहचल्याने त्यांचा जीव वाचला.
यावेळी लाइव्ह जॅकेट नसल्यानेच लोक आपला जीव वाचवू शकले नाहीत.
सांगली शहराला बुधवारी कृष्णा-कोयनेच्या पाण्याने संपूर्ण वेढा दिल्याने सांगली शहर बुडाले असून हजारो घरे-दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सांगलीबरोबरच जिल्ह्य़ातील वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा तालुक्यांतील नदीकाठची गावेही पुराने प्रभावित झाली आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या तब्बल ६० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.