दोन तरुणांच्या मृत्यूने टाकवे गावावर शोककळा...

कार नदीत पडल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक तरुण बचावला आहे. 


संकेत नंदु असवले (वय 20), अक्षय मनोहर जगताप (वय 21) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नवे असून अक्षय संजय ढगे (वय 20) हा तरुण बचावला आहे.

स्विफ्ट डिझायर कारमधून अक्षय ढगे, संकेत असवले, आणि अक्षय जगताप हे तिघेजण गुरुवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास कान्हे फाट्याकडून टाकवे गावाकडे जात होते. संकेत असवले हा कार चालवत होता. इंद्रायणी नदीवर कार आली असता संकेतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. काही वेळेनंतर अक्षय ढगे पोहून बाहेर आला. मात्र त्याचे दोन मित्र कारमध्येच अडकून राहिले.
घटनेची माहिती मिळताच टाकवे गावातील नागरिक नदीकडे धावत आले. दरम्यान, वडगाव मावळ पोलीस, एनडीआरएफच्या पथकांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. एनडीआरएफ च्या जवानांनी दिवसभर नदीपात्रात कार शोधली. मात्र, दिवसभर कार सापडली नाही. 


आयएनएस शिवाजी लोणावळा येथील पथकाने पाणबुड्यांच्या सहाय्याने शोध घेतला. रात्री नऊच्या सुमारास कार शोधण्यात बचाव पथकाला यश आले. क्रेनच्या साहाय्याने कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये संकेत आसवले याचा मृतदेह आढळून आला. अक्षय जगताप मात्र बेपत्ताच होता.अखेर नऊ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह सापडला. 

Review