अल्कोव्ह गृहप्रकल्प बनतोय डेंग्यूचे माहेरघर; बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे रहिवाश्यांच्या जीवाला धोका

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन): पिंपळे सौदागर स्थित अल्कोव्ह गृहप्रकल्प येथे महानगरपालिकेकडून नुकत्याच झालेल्या तपासणीअंती असे आढळले की सदर गृह प्रकल्पाच्या जलतरण तलावात डेंग्यू च्या अळ्या सापडल्या. या दरम्यान सदर गृह प्रकल्पातील रहिवांशांमधून डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले असून त्यापैकी एक रुग्ण अती दक्षता विभागात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्यामुळे अल्कोव्ह गृह प्रकल्प व तसेच शेजारच्या दोन तीन सोसायट्या मधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. 

 सदर प्रकरणी रहिवाश्यांना विचारले असता कळाले की, सदर जलतरण तलावाच पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणा पावसाळ्यात पुर्ण पाण्याखाली जाते ज्यामुळे पम्पिंग यंत्रणा पुर्णपणे बंद असते.  याचे मुळ कारण बिल्डरने बसवलेली चुकीची पम्पिंग यंत्रणा आहे. याच बरोबर सदर गृहप्रकल्पामधे सांडपाणी आणि मैलाशुद्धीकरण यंत्रणा (ETP/STP) ही कमी क्षमतेची आणि निकृष्टपणे बसवलेली आहे. या यंत्रणेतून अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी बागेत सोडले जाते तसेच काही प्रमाणात ते महापालिकेच्या पावसाळी पाणी निचरा  वाहिनीमध्ये सोडले जाते. या कारणांमुळे सदर गृहप्रकल्पात डासांचे साम्राज्य पसरलेले आहे.

सदर गृह प्रकल्प मे. अतुल एंटरप्राईजेस यांचा असून या प्रकल्पात जवळपास २००० रहिवाशी गेल्या ९ वर्षांपासून राहतात. बिल्डरने वचन दिलेल्या बऱ्याच नागरी आरोग्य सुविधा या बिल्डरने पूर्ण केल्या नाहीत.  सोसायटी च्या काळजीवाहू व्यवस्थापनाकडे कायदेशीर अधिकार नसल्यामुळे  थकबाकीदारांवर नियमानुसार कार्यवाही करता येत नाही,अधिकृत गृह निर्माण संस्था नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या व्यतिरिक्त १२ मजल्यांच्या ८ इमारतीमधील एकूण १८ लिफ्टच्या देखभालीची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व स्त्रिया लिफ्ट मध्ये अडकून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 

रहिवाश्यांना होणाऱ्या वरील त्रासाबद्दल महापालिका बांधकाम खाते, आरोग्य खाते तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्याकडे रहिवाशांनी रीतसर तक्रारी वेळोवेळी दाखल केलेल्या आहेत. तसेच नाविलाजने रहिवाशांनी मे. अतुल एंटर प्राईजेस यांचे विरुद्ध सांगवी पोलिस स्थानक येथे रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. वरील सर्व संबंधित कार्यालयाकडून बिल्डर विरुद्ध कार्यवाही होण्याची येथील रहिवाशी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Review