भाजप-राष्ट्रवादीमध्ये रंगले ट्विट युद्ध
मुंबई (सह्याद्री बुलेटिन): सर्व प्रकरण शांत होत असतानाच राष्ट्रवादीने या प्रकरणावर केलेल्या एका ट्विटवरुन नवा वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीच्या या ट्विटवर भाजपाने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत ‘शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का?’ असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.
पवारांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा पवारांचा विजय असल्याच्या अनेक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर केल्या. त्यानंतर ‘ऐसी ख्याती शिवरायांची ओळखूनि भाजपाच्या खेम्यातल्या ‘शहा’स्तेखानाची बोटे छाटुनि रयतेच्या राजाने, कष्टकऱ्यांच्या माय-बापाने ‘ईडी’चे ब्रह्मास्त्र मोडून नव्या शिवस्वराज्याची घडी बसवली…’ असे कॅप्शन देत एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले होते. या व्यंगचित्रामध्ये शाह यांना शाहिस्तेखान दाखवण्यात आले होते तर शरद पवारांना शिवरायांची उपमा देत शाह यांची ‘ईडीमहला’त बोटे कापताना दाखवण्यात आले होते.
भाजपा महाराष्ट्रच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्टही पोस्ट करण्यात आला आहे. ‘स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा तीव्र निषेध या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही,’ असं भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.