“ रयत शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण”
पिंपरी(सह्याद्री बुलेटीन-प्रविण डोळस) : रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयांमध्ये रयत शताब्दी पूर्ती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी पूर्ती निमित्ताने कर्मवीर अण्णा यांच्या अर्ध पुतळा प्रतिमेस विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग उपस्थित होते.
अज्ञानाच्या अंधकारातील समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले तालुका कराड जिल्हा सातारा येथे थोर शिक्षण महर्षी ,महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन, आधुनिक भगीरथ पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. "निजदेहाचे झिजवुनी चंदन ज्यांनी वेचला येथे कणकण त्या कर्मयोग्यास त्रिवार वंदन" खरोखर स्वतः चंदनाप्रमाणे देह झिजवून इतरांना सुगंध वाटणारे कर्मयोगी, दीनदलित वंचित उपेक्षित समाज घटकांचे उद्धारकर्ता, चैतन्यशील माणूस घडवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या या सेवाव्रतात अखंडपणे, कष्टांची तमा न बाळगता साथ देणारी त्यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील रयत माऊली यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे ग्रंथपाल श्री. बावके दत्तात्रय यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या शताब्दी पूर्ती निमित्ताने विद्यालयात रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक राशिनकर प्रवीण यांनी विद्यार्थिनींना अण्णांच्या कार्याची माहिती सांगितली व काटकर अमृतराव यांनी घोषणा देऊन विद्यालयामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण केले.विद्यालयातील या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व मार्गदर्शिका पडवळ संगीता मॅडम व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पाटील उर्मिला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये विद्यालयतील 5 वी ते 10 वी तील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर सेवक वृंद सहभागी होते.