गायक नितीन बाली यांचा रस्ते अपघातात मृत्यू

‘कलाकार’ या चित्रपटातील ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्याच्या रिमिक्समुळे लोकप्रिय झालेले गायक नितीन बाली यांचा मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते ४७ वर्षाचे होते, रुग्णालयातील उपचारानंतर घरी गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
नितीन बाली हे सोमवारी मध्यरात्री आपल्या कारमधून दहिसर येथून बोरिवलीला जात होते. त्यावेळी त्यांची कार दुभाजकाला धडकली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली होती. त्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यानी मद्य प्राशन केले होते. त्यांच्या वाहनात बिअरच्या कॅनही आढळून आल्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत कठाणे यांनी सांगितले.
घरी पोहोचल्यानंतर काही वेळाने बाली यांना रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. त्यांचा रक्तदाब (बीपी) कमी झाला आणि ते बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या भाचीने या घटनेला दुजोरा दिला असून बाली यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे
नीले नीले अंबर पर या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. एका रात्रीत ते सुपरस्टार झाले होते. परंतु, त्यानंतर त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही.

Review