नवरात्री 2024 : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल

पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले

नवरात्रीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 3 ते 12 ऑक्टोबरदरम्यान शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

नवरात्री 2024 : पुण्यातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल; पोलिसांकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले
Traffic changes
 

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात 3 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नवरात्र काळात भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक बदलासंदर्भात पुणे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक बदलाची व्यवस्था:

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात प्रमुख बदल करण्यात आले आहेत. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौकपर्यंत वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास या मार्गांवर अधिक बदल केले जाऊ शकतात. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, आणि नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मंदिरांत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिसांनी नदीपात्रातील रस्त्यावरील आणि मंडईतील वाहनतळांचा वापर करण्याची सूचना केली आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांनी पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गदर्शनानुसार वाहतूक नियमांचे पालन करावे, जेणेकरून मंदिर परिसरात गर्दीचा त्रास होणार नाही आणि भक्तांना सुखकर अनुभव मिळेल.

Review