विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी!
राज ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. अशातच आता पुढील आठवड्यात मनसेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी मनसेची जोरदार तयारी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा, उमेदवारांची घोषणा होणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभर दौरे करत विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागांमध्ये राज ठाकरेंनी सभांद्वारे नागरिकांशी संवाद साधला, आणि त्याचबरोबर विविध जागांची चाचपणीही केली आहे.
राज ठाकरे करणार उमेदवारांची घोषणा?
राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत. मात्र, मनसेने एकला चलो रे चा नारा दिला असून, कोणत्याही आघाडीत सहभागी न होता विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेचा कार्यकर्ता मेळावा आणि उमेदवारांची घोषणा
मनसेच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा येत्या १३ किंवा १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मेळाव्यात राज ठाकरे पक्षाच्या विधानसभेच्या रणनितीवर भाष्य करतील, तसेच उमेदवारांची अधिकृत घोषणा करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर केलेल्या दौऱ्यानंतर विधानसभेच्या विविध जागांचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसारच उमेदवारांची निवड केली जाईल. या मेळाव्यानंतर मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम तयारी स्पष्ट होईल.
निवडणूक रणनितीची आखणी
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना, मनसेने देखील आपल्या जागांसाठी नियोजन केले आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे विधानसभा निवडणुकांसाठी सुसज्ज होत आहे, आणि त्यांच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात नवा रंग भरला जाणार आहे.