
राम कदमांनी व्यक्त केला खेद...
मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - विरोधकांनी माझे वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे म्हणत भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी क्लिप व्हायरल केली त्यात मी थांबलो आहे, पॉज घेतला. त्यात एका दर्शकाने प्रतिक्रिया दिली, त्याला मी उत्तर दिले. माझे बोलणे संपल्यावर मी पुढे असेही म्हटलो होतो की प्रत्येक घरातली आई, मुलगी, बहिण हे लक्ष्मीचे रूप आहे, तिचा मान सन्मान करा, ते कोणी ही का व्हायरल केले नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. मी जे बोलले त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
दहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांशी संवाद साधत असताना भाजपाचे आमदार राम कदम यांचा ताबा सुटला. ”उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन” असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले. त्या नंतर राम कदम यांच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच रंगली. तसेच राम कदम यांचे वक्तव्य महिलांचा अनादर करणारे आणि निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया उमटली. यानंतर या वादावर पडदा टाकण्यासाठी राम कदम यांनी खेद व्यक्त केला आहे.