
...तर असं असणार २० रुपयांचं नाणं
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी नाण्यांच्या नवीन डिझाईनची सिरीज लॉन्च केली. यात एक रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतच्या नाण्यांचा समावेश आहे. या नाण्यांची निर्मिती मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथे होणार आहे. तसेच नवी नाणी चलनात आल्यानंतर जुनी नाणी देखील चलनात राहणार आहेत. 1, 2, 5 आणि 10 या जुन्या नाण्यांसह केंद्राने 20 रुपयांचे नवीन नाणेही लॉन्च केले आहे.
20 रुपयाच्या नाण्याची वैशिष्ट्य
> नाण्याचा आकार 27 एमएम एवढा असणार
> याचे वजन 8.54 ग्रॅम असेल.
> 12 किनार असणाऱ्या या नाण्यांच्या काठांवर कोणत्याही प्रकारची डिझाईन नाही
> नाण्याच्या बाहेरच्या रिंगमध्ये 65 टक्के तांबे, 15 टक्के जस्त आणि 20 टक्के निकेल असणार आहे
> आतील रिंगमध्ये 75 टक्के तांबे, 20 टक्के जस्त आणि पाच टक्के निकेल असणार आहे
> नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभाचे निशाण असेल आणि त्याखाली 'सत्यमेव जयते' लिहिलेले असणार आहे
> नाण्याच्या डाव्या बाजूला 'भारत' असे लिहिले असेल तर उजव्या बाजूला 'INDIA' लिहिले असेल
> नाण्याच्या मागील बाजूला 20 रुपये असा उल्लेख असेल आणि त्यावर रुपयाचे चिन्ह
> यासह शेतीप्रधान देशाचे चिन्ह म्हणून धान्याचे चित्रही असणार आहे
दिव्यांगांसाठी खास
2011 मध्ये चलनात आलेल्या नाण्यांबाबत अंध आणि दिव्यांगांनी तक्रार केली होती. अंधांना नाणी ओळखण्यास अडचण येत होती. त्यामुळे आता नव्याने चलनात येणाऱ्या नाण्यांच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. या नाण्यांवर हिंदुस्थानी सरकारच्या योजना चितारण्यात येणार आहेत. 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'डिजिटल इंडिया' आणि 'कृषी भारत' या योजनांचा यात समावेश असणार आहे.
याआधी 2011 मध्ये चलनातील नाण्यांचा आकार बदलण्यात आला होता आणि नवी नाणी चलनात आली होती. त्याआधी 2009मध्ये 10 रुपयांचे नाणे चलनात आले होते. चलनात आल्यानंतर तब्बल 13 वेळा 10 रुपयांच्या नाण्याचा आकार बदलण्यात आला होता. सध्या असे 14 प्रकारचे नाणे चलनात आहेत.
अटलबिहारी वाजपेयींचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणं जारी
याआधी काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांचे नाणे लॉन्च करण्यात आले होते. या नाण्यावर अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो चित्रित करण्यात आला होता.