
वरुणराजा बरसायला लागला...
महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुरळक पाऊस पडायला सुरवात झाली असून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज प्रत्यक्षात येत आहे. या मुळे बळीराजा आणि नागरिक सुखावले तरी हातातोंडाशी आलेला पिकांचा घासही हिरावून जाण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडय़ातील लातूर जिल्ह्यमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात इतर ठिकाणीही मेघगर्जनेसह पावसाळा सुरुवात झाली आहे.
ढगाळ स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी तापमानात घट झाली होती. मात्र, कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत पुन्हा वाढले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ नोंदविली गेली. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढले आहे. कोकण विभागातही कमाल तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. इतर ठिकाणचे तापमान ४२ ते ४५ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडय़ात परभणीचे तापमान ४५.६ अंशांवर गेले असून, इतर ठिकाणीही तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. पुण्याचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. महाबळेश्वरचे तापमानही सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ अंशांनी वाढले आहे.