धडक ची धडक...

‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला, करण जोहर निर्मित आणि शशांक खैतान दिग्दर्शित हा चित्रपट ‘धडक’...
पार्थवी सिंग (जान्हवी कपूर) ही रतन सिंग (आशुतोष राणा) या एका राजकीय नेत्याची लाडावलेली लेक असते. लाडात आणि थाटात वाढलेली ही मुलगी मधूकर (ईशान खट्टर) नावाच्या एका सामान्य मध्यमवर्गीय तरूणाच्या प्रेमात पडते. मधू हा एका लहानशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो. आपल्यापेक्षा पार्थवी उच्च जातीची आहे, हे माहित असल्याने मधूच्या वडिलांना मधू व पार्थवीची वाढती मैत्री आवडत नसते. इकडे पार्थवीच्या भावालाही या दोघांची मैत्री खटकत असते. पार्थवीचे वडिल पहिल्यांदा राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि नेमक्या याचवेळी मधू अन् पार्थवीचे प्रेम रंगात येते. अखेर घरच्या विरोधामुळे मधू व पार्थवी दोघांनाही घरून पळून जावे लागते. पार्थवीच्या वडिलांच्या गुंडापासून स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात दोघेही शहर सोडतात. याकाळात मधूचे कुटुंब आणि त्याच्या मित्राचा छळ होतो. घर सोडून पळालेल्या मधू व पार्थवीलाही बरेच हाल सहन करावे लागतात.
‘सैराट’मध्ये आर्ची भाव खावून जाते. तर ‘धडक’मध्ये मधू भाव खावून जातो. त्याचा भाबडेपणा प्रेक्षकांची मने जिंकतो. जान्हवीने रंगवलेली पार्थवी पडद्यावर तितकीशी बोल्ड आणि बिनधास्त वाटत नाही. पण या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत जाणवते. ‘सैराट’ची कथा केवळ आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेवर प्रकाश पाडते. पण ‘धडक’च्या कथेची व्याप्ती बरीच मोठी आहे. पार्थवीचे आई-वडिल, मधूचे आई-बाबा, त्याचे मित्र अशी सगळी खूप महत्त्वाची पात्रे आपले लक्ष वेधून घेतात. पहिल्या पाचचं मिनिटांत हा चित्रपट तुम्हाला पार्थवी आणि मधूच्या दुनियेत नेतो आणि मग पूर्णवेळ खिळवून ठेवतो. ‘सैराट’मध्ये प्रतिकात्मकरूपात दाखवलेल्या अनेक गोष्टी ‘धडक’मध्ये उघडउघड व्यक्त केलेल्या दिसतात.

Review