अण्णा हजारेंचे उपोषण मागे...

महात्मा गांधी जयंतीच्या अनुषंगाने लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसंदभात हजारे हे मंगळवारपासून राळेगणसिद्धीत उपोषण सुरू करणार होते. या पार्श्वभूमीवर सकाळी गिरीश महाजनही राळेगणसिद्धीत पोहोचले. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर महाजन आणि अण्णा हजारेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गिरीश महाजन यांची शिष्टाई सफल झाली असून अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारने निर्णय घेतले आहेत. मी काही अंशी समाधानी आहेत. पण अनेक निर्णय फक्त कागदावरच आहेत, आता त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे हजारेंनी नमूद केले. अण्णा हजारे म्हणाले, आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारने पावले उचलली आहेत. यातून आशेचे किरण दिसत असल्याने उपोषण स्थगित करत आहेत. मात्र, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा उपोषणाला बसू, असे त्यांनी सांगितले. केंद्रात लोकपाल असले तरी राज्यात अद्याप लोकायुक्ताची नियुक्ती झालेली नाही. जुने लोकायुक्त कामाचे नाहीत, ते फक्त दिखाव्यासाठी आहेत, अशी टीका त्यांनी केली. केंद्राप्रमाणे राज्यात लोकायुक्ताची नियुक्ती व्हावी, त्याला मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, आयएएस सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार हवे, असे त्यांनी नमूद केले.
सरकारने अण्णांच्या मागणी संदर्भात सकारात्मक पाऊल उचलले आहे. या मागणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी हीच जनतेची मागणी आहे.

Review