अभिनेते किशोर प्रधान यांच निधन...

( सह्याद्री बुलेटिन ) प्रसिद्ध हास्य अभिनेते किशोर प्रधान यांच रात्री उशिरा निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.
मराठी प्रमाणेच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.

किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. त्यांच्या आई मालतीबाई प्रधान यांना नाटकांची आवड होती. ४० च्या दशकात त्या नाटकातून काम करायच्या. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले.

अभिनयाची कारकीर्द किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली.ग्लॅक्सो कंपनीत नोकरी करीत असताना अंगातील कला आणि नाटकाची ओढ प्रधनांना स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एम‍आय‍जी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक बसवून सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले.भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. किशोर प्रधान यांनी १८हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत.

 

Review